लहानपणीपासून शिक्षकदिन म्हटले की, अंगात एक वेगळाच उत्साह संचारायचा. प्रत्येकाची आपली-आपली भूमिका ठरलेली असायची. (त्यातही आपले सर्वात आवडते शिक्षक-शिक्षिका बनण्याची चढाओढ) कोणी मुख्याध्यापक, कोणी चपराशी अशा सर्व प्रकारच्या विविध भूमिका करीत 5 सप्टेंबर या दिवशी पूर्ण शाळेची जबाबदारी ही विद्यार्थी दशेत सर्वजण घ्यायचे.
पण मागील वर्षापासून कोरोनामुळे शाळेत मुलांना बोलविता येत नाही आणि ऑनलाईन सगळे उपक्रम राबवायचे आहेत/राबविल्या जात आहेत. पण ग्रामीण भागात ऑनलाइन नेटवर्कची समस्या आणि सोबतच इतर संसाधने नसल्यामुळे किंवा कमतरता असल्यामुळे फक्त उपक्रम राबवायचे म्हणून या सर्व गोष्टी केल्या जातात.
परंतु विद्यार्थी शाळेत नाहीत तर मग त्या शिक्षकदिनाला अर्थच उरत नाही. कारण, जेव्हा विद्यार्थी शिक्षकांच्या भूमिकेत येतात त्यावेळी त्यांना आपले शिक्षक कशाप्रकारे कोणताही घटक शिकविण्यापूर्वी किती तयारी करतात? याची जाणीव होते, वर्गात विद्यार्थ्यांना शिकविताना शिक्षक सुनियोजित पद्धतीने आपले अध्यापनकार्य कसे पार पाडत असतात?, सोबतच सर्व शाळेची जबाबदारी कशा पद्धतीने सांभाळली जाते? याची जाणीव विद्यार्थ्यांना होते.आणि त्याचाच सकारात्मक प्रभाव हा पूर्ण वर्षभर विद्यार्थ्यांच्या वागण्या-बोलण्यातून जाणवत असतो. ऑनलाइन शिक्षणाचा विरोध मी करतो असं नाही, ऑनलाइन शिक्षणाचा पुरस्कर्ता मी सुद्धा आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी परिस्थितीनुरूप निर्णय घेणे गरजेचे आहे आणि अशा कार्यक्रम प्रसंगी तर भावनांची गरज असते आणि त्यावेळी ऑनलाइनपेक्षा ऑफलाइनच जास्त प्रभावकारी ठरते, असे माझे वैयक्तिक मत आहे.आज शाळा बंद जरी असल्या तरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत घरोघरी जाऊन शिक्षण पोहोचविण्याचा मोडका-तोडका प्रयत्न आपापल्या परीने आम्ही करीत आहोत. (यात काही शिक्षक अपवाद असतील यात बिलकुल शंका नाही)
ज्यावेळी आम्ही घरी जाऊन शिक्षण देण्याचा मागच्या वर्षभरापासून प्रयत्न करतोय त्यावेळी दिसून येतं की, मुलांची शिकण्याची इच्छा आहे परंतु पुरेसा वेळ त्यांना देता येत नाही आणि धावतं शिक्षण सर्व 75 मुलांना दररोज मिळावं, याचा प्रयत्न आम्हा सर्वांकडून होतो. मुलेसुद्धा शिक्षकांकडून जे जे दिलं जात आहे, ते आपल्या कवेत घेऊन आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात आणि ते नक्कीच वाखाणण्याजोगं आहे. कारण, शिक्षक असताना घेतलेले शिक्षण आणि शिक्षक नसतांना 'स्वबळावर घेतलेले शिक्षण' यात जमीन-अस्मानचा फरक आहे, हे एका शिक्षका व्यतिरिक्त आणखी कोण चांगल्या पद्धतीने समजू शकतो?
जाता जाता ईश्वराला इतकीच प्रार्थना आहे की, पुढच्या वर्षीचा शिक्षकदिन तरी खरोखर 'शिक्षकदिन'च व्हावा. त्यादिवशी पुन्हा शिक्षक 'दीन' असल्याचा अनुभव देऊ नये!!
पवन