Wednesday, November 10, 2021

दुभंगलेल्या ओठांना, मोफत सुंदर हास्य देणारे - 'देवरुपी डॉक्टर सुबोध कुमार सिंग'


एक-दोन दिवसांपूर्वी
@thakkar_sameet
  समितभाऊ यांनी एक न्यूज आर्टिकल शेयर केले होते आणि ते वाचल्यावर वाटले की, हे आणखी लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून हा लेख.

एखाद्याने जर आपलं लहानपण गरीबीत घालविले असेल आणि संघर्षातून तो डॉक्टर बनला असेल तर तो नक्कीच जनमाणसाचे दुःख समजू शकतो, हे त्रिकालबाधित सत्य आहे.

असेच एक डॉक्टर आहेत 'सुबोध कुमारसिंग' जे प्लास्टिक सर्जन आहेत. डॉक्टर बनण्यासाठी त्यांनी त्यांच्या लहानपणी खूप संघर्ष केला आहे त्यामुळेच आता ते cleft lip/palate या व्यंगासह जन्मलेल्या बालकांची मोफत शस्त्रक्रिया करतात. आजपर्यंत त्यांनी 37000 शस्त्रक्रिया केलेल्या आहेत.

शालेय जीवनात ते एक मेरिटमध्ये येणारे विद्यार्थी होते आणि वाराणसी येथे 1979 शाळा/कॉलेज शिकताना ते चष्मा आणि हात धुवायचा साबण विकून आपल्या परिवाराला आर्थिक मदत करायचे.

'जागतिक स्माईल ट्रेन'च्या  छत्राखाली ते अनेक मुलांच्या cleft lip/palate  व्यंग दुरुस्तीच्या शस्त्रक्रिया करतात. आजपर्यंत 25000 परिवाराच्या चेहर्‍यावर त्यांनी हास्य फुलविले आहे. यासाठी त्यांना 37000 मोफत cleft lip/palate शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आहेत.

 
cleft lip/palate हे आजकाल एक सामान्यत:  जन्मत: येणारे व्यंग आहे, हे बरेचदा जेनेटिक असतं. यामुळे तोंड उघडण्यास, बोलण्यास, इतकेच नव्हे तर जेवताना सुद्धा त्रास होतो. डॉक्टर सिंग यांच्या या आजारावरील मोफत शस्त्रक्रियेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ओळख मिळाली आहे . 2009 च्या 'अकादमी पुरस्कार' आणि 2013 मध्ये 'विम्बल्डन पुरुष सिंगल्स' च्या फायनल मॅचच्या 'सेंट्रल कोर्ट' वर असलेल्या प्रमुख अतिथीपैकी ते एक होते.


त्यांचे वडील ज्ञान सिंग हे रेल्वेमध्ये कारकून होते आणि 1979 मध्ये त्यांच देहावसान झालं (कदाचित ते चांगल्या वैद्यकीय सुविधा न मिळाल्यामुळे मृत्यू पावले)   

डॉक्टर सिंग सांगतात की, जो कोणी बालक त्यांच्याकडे cleft lip/palate व्यंग घेऊन  आला त्यांना त्याच्यामध्ये लहानपणीचा 'सुबोध' दिसला. ज्याला तेराव्या वर्षी आपल्या वडिलांना गमावण्याच दुःख होतं. ते म्हणतात की, त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्यावर संस्कार केले की, गरिबांची सेवा केली पाहिजे आणि म्हणूनच त्यांना वाटतं की याच समाजकार्यासाठी  देवाने त्यांना व्यवसायिक बनवलं नाही तर त्याऐवजी एक 'प्लास्टिक सर्जन' बनवलं.

वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवलं. एका लहानशा रेल्वे क्वार्टरमध्ये वाराणसीत ते राहत होते.  त्यांना जे काही 'ग्रॅच्युईटी' म्हणून थोडेफार पैसे मिळाले ते वडिलांच्या मृत्यूनंतर सगळं कर्ज फेडण्यात गेले. त्यामुळेच ते आपल्या मोठ्या भावासोबत गृहोद्योगातून बनवलेल्या साबण विकायला जायचे. बरेचदा उधारीचे पैसे मागितल्यावर त्यांना अपमानित सुद्धा केल्या गेलं.

काही कालावधीनंतर त्यांच्या मोठ्या भावाला रेल्वेमध्ये 'अनुकंपा' मध्ये नोकरी मिळाली. पण तरीही जे पैसे मिळत होते, ते कमीच होते. 1982 मध्ये जेव्हा त्यांच्या भावाला 579 रुपयाचं बोनस मिळालं. त्यावेळी त्यांनी ते  पैसे 'सुबोध' यांच्या ' वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश परीक्षे' साठी दिले. त्याचा सुबोध यांच्या मनावर खूप मोठा प्रभाव पडला.

त्यांनी ठरवलं की, भावाने केलेलं हे योगदान ते वाया जाऊ देणार नाही. याच जिद्दीतून त्यांनी एक नाही तर तीन 'वैद्यकीय प्रवेश परीक्षा' पास केल्या होत्या. ज्यामध्ये 'आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज'(एएफएमसी पुणे),  बीएचयू-पीएमटी आणि यूपी स्टेट कम्बाईन प्री मेडिकल टेस्ट (सीपीएमटी) 1983 मध्ये पास केल्या होत्या. त्यातून त्यांनी  बीएचयू निवडलं होतं. जेणेकरून आपल्या विधवा आईला आणि भावाला 'जनरल स्टोअर' चालवून ते हातभार लावू शकतील.

2002 मध्ये वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 'मोफत सेवा' देण्यास सुरुवात केली. 2003-04 पासून त्यांनी cleft lip/palate  व्यंग सुधारात्मक शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली. तो 'स्माईल ट्रेन प्रकल्पा'चाच (जागतिक स्तरावर सर्वात मोठी cleft lip/palate  व्यंग सुधारात्मक शस्त्रक्रिया केंद्रीत असलेली संस्था)  एक भाग होता.


त्यांनी डिसेंबर 2005 पर्यंत 2500 cleft lip/palate  व्यंग सुधारात्मक शस्त्रक्रिया करण्याचे उद्दीष्ट ठेवले होते. त्यावेळी  'स्माईल ट्रेन इंडिया टीम'ला त्यांचे लक्ष खूप महत्वकांशी वाटले. म्हणून त्यांनी डिसेंबर 2005 पर्यन्त फक्त 500 मोफत शस्त्रक्रिया केल्या तरी चालेल, असे सांगितले. पण हे 500 मोफत शस्त्रक्रियांचे  लक्ष सुबोधकुमार यांच्या टीमने डिसेंबर 2004 च्या अखेरीस पूर्णत्वास नेले. आणि 2005 च्या डिसेंबरपर्यंत ते 2500 चा टप्पा ओलांडून पुढे गेले.


2008-09 पासून त्यांनी या उपक्रमाअंतर्गत दरवर्षी 4000 पेक्षा जास्त मोफत शस्त्रक्रिया केलेल्या आहेत.

अनेक प्लास्टिक सर्जन, सामाजिक कार्यकर्ते, पोषण आहार तज्ञ, स्पीच थेरपिस्ट यांच्या टीमसह डॉक्टर सिंग यांनी देशभरातील विशेषतः पूर्व आणि ईशान्य भारतातील cleft lip/palate  व्यंगासह जन्मलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी एक 'बाह्यस्थळी कार्यक्रम' सुरू केला. त्यात त्यांनी फक्त जन्मजात व्यंगच दुरुस्त केले नाही तर ज्या कुटुंबात  cleft lip/palate  या व्यंगासह मूल जन्माला घातले म्हणून पतीने पत्नीला सोडून दिले. त्या कुटुंबातील मुलांच्या शस्त्रक्रिया करून त्या कुटुंबांनाही एकत्र केले. इतकेच नव्हे तर ''पोषण सहाय्य प्रशिक्षण' कार्यक्रमाद्वारे शेकडो गंभीर कुपोषित मुलांना त्यांनी वाचविले आहे.

मालदा (पश्चिम बंगाल) येथील मजूर कार्तिक मोंडल सांगतात की, त्यांच्या सोनू नावाच्या 5 वर्षाच्या मुलावर कलकत्ता येथील रुग्णालयाने उपचार करण्यास नकार दिला आणि त्यांना शस्त्रक्रिया थांबविण्यास सांगितले. पण डॉक्टर सिंग व त्यांच्या टीमने मोंडल यांच्या पाच महिन्याच्या गंभीर कुपोषित असलेल्या व जन्माच्या वेळी आलेल्या फाटलेल्या ओठांच्या टाळूच्या  व्यंगावर ( cleft lip/palate) शस्त्रक्रिया करून सुधारणा केली व त्या मुलाला नवजीवन दिले. त्यामुळेच ते डॉक्टर त्यांच्यासाठी व कुटुंबासाठी देव आहेत.


डॉक्टर सिंग हे 'स्माईल ट्रेन' उपक्रमाअंतर्गत जागतिक प्रशिक्षक आणि वक्ते आहेत. वाराणसीतील त्यांचे रुग्णालय हे जगातील अनेक डॉक्टरांसाठी एक प्रमुख केंद्र बनले आहे. जिथे जगभरातील सर्जन cleft lip/palate या टाळूच्या शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेण्यासाठी येतात.

2004 मध्ये हा उपक्रम सुरू केला तेव्हा रुग्णाचे सरासरी वय 10.8 वर्षे होते आता सरासरी वय हे 01 वर्ष आहे. जे आता त्यांना 03 महिन्याच्या वयातच सुधारात्मक शस्त्रक्रियेद्वारे सर्व  cleft lip/palate व्यंग असलेल्या मुलांच्या चेहर्‍यावर  हसू आणण्याच्या लक्ष्याजवळ घेऊन जात आहे .त्यांच्याकडे असलेले रुग्ण आहे 03 महिन्याच्या मुलापासून 70 वर्षाच्या वृद्ध महिलेपर्यंत आहेत.

या स्माईल ट्रेन प्रकल्पाने 2008 मध्ये मेगन मिलानला 39 मिनिटाची डॉक्युमेंट्री 'स्माईल पिंकी-2008' बनवण्याची प्रेरणा दिली. डॉक्टर सिंग आणि त्यांच्या टीमने 'पिंकी सोनकर' (मिर्जापुर पूर्व यूपीच्या रामपूर दाबही गावातून)  या एका वंचित चिमुरडीच्या जीवनात कसा बदल घडविला आहे? हे  त्या डॉक्युमेंटरी दाखवले आहे. 
'शॉर्ट डॉक्युमेंट्री' प्रकारात या डॉक्युमेंट्रीला 'ऑस्कर' मिळालेला आहे.  पिंकी आणि डॉक्टर सिंग दोघेही फेब्रुवारी 2009 मध्ये अमेरिकेतील 'अकादमी पुरस्कार' सोहळ्यात ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होते.




तिथून चार वर्षानंतर 2013 मध्ये अँडी मरे आणि नोव्हाक जोकोविच यांच्यात झालेल्या 'विम्बल्डन पुरुष सिंगल्स' च्या फायनल मॅचच्या  'सेंट्रल कोर्ट'वर 'सामनापूर्व नाणे फेक'ण्याचा मान हा पिंकी सोनकरला देण्यात आला होता आणि सोबतीला डॉक्टर सुबोध सिंग हे प्रमुख अतिथिंपैकी एक होतेच.

डॉक्टर सिंग यांच्या टीमने गंभीर भाजलेल्या रुग्णाला सामान्य जीवन जगता यावे म्हणून 6000 रुग्णावर सुद्धा मोफत शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. त्यांच्या या प्रयत्नामुळे 'बर्ण्ड गर्ल-2015' अशी डॉक्युमेंटरी 'नॅशनल जिओग्राफिकने बनवलेली आहे. ज्यामध्ये नऊ वर्षाच्या 'रागिणी'च्या जीवनाचे तपशीलवार वर्णन केले होते. लहानपणी जळल्यामुळे तिचे बालपण बेचिराख झाले होते पण डॉक्टर सिंग यांनी अनेक कठीण शस्त्रक्रिया करून तिचे बालपण तिला परत मिळवून दिले. या डॉक्युमेंटरीला सुद्धा अनेक जागतिक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.


स्वतः खडतर परिस्थितून आल्यानंतर सामान्य लोकांचे दु:ख दूर करण्यासाठी काम करीत असलेल्या या 'देवरुपी डॉक्टर सुबोध कुमार सिंग' यांना मनापासून 'मानाचा मुजरा' आणि त्यांचे हे सेवाव्रत अखंडपणे सुरू राहो, यासाठी देव त्यांना दीर्घायुष्य देवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

 
@thakkar_sameet
  समितभाऊ तुम्ही हे आर्टिकल शेयर केले नसते तर कदाचित माझ्यासारख्या सामान्य माणसाला डॉक्टरांबद्दल कळले नसते, त्यामुळे तुमचेही आभार!!

धन्यवाद!

पवन✍️

माहिती साभार : द न्यू इंडियन एक्स्प्रेस वर्तमानपत्रातील अनुराग सिंग यांचा इंग्रजी लेख.
 




भारत 1989-2014 आणि नंतर - आमुलाग्र बदल!!

रविवार विशेष!! आजचा लेख जरा जास्तच मोठा आहे. पण भारताचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ समजून घ्यायचा असेल, तर आवर्जून वाचाच. भारतात नेहमीच...