आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात' कार्यक्रम ऐकत असताना मनात विचार आला की, मोदी यांच्या आवाजात लोकांना आकर्षित करण्याची जी जादू आहे. तिचा वापर त्यांनी 2014 नंतरच का सुरू केला ? त्यांनी यापूर्वी याचा वापर का केला नाही? माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता जी माहिती मिळाली ती माझ्यासाठी नवीन होती आणि माझ्यासारखे इथे अनेक असतील म्हणून आपल्यासोबत मिळालेली माहिती शेयर करतोय.
नरेंद्र मोदी यांनी संघाच्या/भाजपाच्या कार्यालयात चहा बनविण्यापासून ते कार्यक्रम संयोजक म्हणून निभावलेली भूमिका जवळपास आपल्यापैकी सर्वांनाच माहिती आहे. ज्याचे योगदान त्यांच्या मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री म्हणून उदय होण्यात नक्कीच आहे. त्त्यांच्या या प्रवासाच्या बाबतीत बर्याच कथा आपण ऐकलेल्या आहेतच. परंतु भारतीय जनता पक्षातील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील मीडिया मॅनेजमेंट टीमसाठी 'व्हॉइस आर्टिस्ट' म्हणून त्यांनी दिलेल्या योगदानाकडे बर्याच लोकांचं दुर्लक्ष होतं.
आज मोदी जनतेच्या गळ्यातील ताईत आहेत. ते बोलायला लागले की, टाचणी पडली तरी ऐकू येईल इतक्या शांतपणे जनता ऐकून घेते आणि सोबतच त्यांनी एखाद्या बाबतीत भाषणादरम्यान प्रतिक्रिया मागितली तर आसमंत दणाणून सोडेल इतक्या जोरात त्यावर जनतेकडून प्रतिसादही मिळतो. याला कारण म्हणजे मोदींकडे असलेला लोकांच्या मनाचा ठाव घेणारा आवाज आणि सोबतच असलेले वक्तृत्व कौशल्य आहे.
त्यामुळेच शीर्षस्थ नेतृत्वाने 80-90 च्या दशकात मोदींच्या आवाजाचा वापर जनतेपर्यंत निवडणूक प्रचार सामग्री पोहोचविण्यासाठी केलेला आहे. निवडणुकीच्या वेळी मोदी अनेक तास आणि दिवस हे रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये घालवायचे. विविध भाषांमध्ये असंख्य ऑडिओ टेप तयार केले जायचे. त्यामुळे निवडणुकीत इतर गोष्टींसोबतच यातूनही पक्षाला पाठिंबा मिळण्यास मदत व्हायची.
या व्हॉइस रेकॉर्डिंग सोबतच मोदी हे 1980 ते 90 च्या दशकात प्रवक्त्याची भूमिका निभावणार्या मीडिया मॅनेजरपैकी एक होते. आजही तुम्ही त्या वेळेसच्या व्हिडीओ क्लिप्स युट्युब वर बघू शकता. ज्यामध्ये तुम्हाला मोदींनी पक्षाचे प्रवक्ते म्हणून मीडिया चॅनेलला दिलेला त्वरित आणि चपखल प्रतिसाद दिसून येईल. इतकेच नव्हे तर त्याकाळी मीडियाद्वारे प्रतिक्रियेसाठी शोधल्या जाणार्या महत्वाच्या/आवडत्या व्यक्तींपैकी एक व्यक्ती नरेंद्र मोदी होते. कारण त्यांची प्रतिक्रिया ही नेहमीच शांत आणि संयमी असायची. त्यामुळेच त्यांचा आणि पत्रकारांचा परस्पर-संबंध देखील दृढ झालेला होता.
पण 2002 च्या गुजरात दंगलीनंतर मुख्य प्रवाहातील मीडियाने स्वतःचे गिधाडात रुपांतर केले आणि मोदींना विनाकारण टार्गेट करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांनी हळूहळू त्यांच्यापासून स्वतःला दूर करण्यास सुरुवात केली आणि तेव्हापासूनच मोदींची व्हॉइस रेकॉर्डिंग आणि स्टुडिओमधले संवाद जवळपास संपुष्टात आले होते.
परंतु 2014 च्या निवडणुकीतील विजयानंतर मोदी पुन्हा एकदा आपल्या व्हॉइस रेकॉर्डिंगच्या माध्यमातून जनतेशी सरळ संवाद साधण्यास प्रवृत्त झाले. ज्यातून मग 'मन की बात' नावाचा कार्यक्रम सुरू झाला. मन की बात हा मासिक असलेला रेडिओ कार्यक्रम आता जागतिक चर्चेचा विषय बनलेला आहे आणि यातून करोडो भारतीयांचे मन जिंकण्यात मोदी यशस्वी ठरलेले आहेत. राष्ट्रीय महत्त्व असलेल्या विविध मुद्द्यांवर रेडिओच्या माध्यमातून त्यांचे व्हॉइस रेकॉर्डिंग लोक मंत्रमुग्ध होवून ऐकतात, त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे पालनही करतात. ज्यातून भारताला पुढे नेण्यास मदत मिळते.
धन्यवाद!!
पवन
साभार : ओय विवेक यांची पोस्ट.