Tuesday, September 7, 2021

तान्हा पोळा! आपले सण, आपली संस्कृती!!


विदर्भात बैल पोळ्याच्या दुसर्‍या दिवशी 'तान्हा पोळा' हा साजरा करण्यात येतो. या दिवशी लहान मुले लाकडी नंदीबैल घेऊन घरोघरी जातात. ज्याप्रमाणे बैलपोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणार्‍या बैलांविषयी कृतज्ञता म्हणून 'बैलजोडी' ही घरोघरी नेल्या जाते आणि त्यांची पुजा केली जाते. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी लहान मुले ही आपला लाकडी  'नंदीबैल' घेऊन घरोघरी जातात. त्यांची (मुलांची)  आणि नंदीबैलाची महिला मंडळीकडून मोठ्या श्रद्धेने पुजा केली जाते. 

लहानपणी आम्हीसुद्धा नंदीबैल घेऊन घरोघरी जायचो. त्यावेळी इतकी आर्थिक सुबत्ता नसल्याने कोणाच्या घरी आम्हाला खाऊ म्हणून साखर दिली जायची तर कोणाच्या घरी खोबरा गोळी. जास्तच सधन असतील तर 50 पैसे - 1 रुपये वाले चोकलेट आणि त्याहीपेक्षा जास्त सधन असतील तर मग पैसे मिळायचे. 50 पैसे, 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपये सुद्धा मिळायचे. एकदा नंदी बैल घरोघरी नेऊन आणला की, आम्ही  सर्व मित्रमंडळी एका ठिकाणी जमून मग कोणाला जास्त कमाई झाली? याची मोजदाद करीत असू. आजच्या काळात प्रत्येकाच्या घरात आर्थिक सुबत्ता असल्याने पैशाचे तितके काही अप्रूप वाटत नाही, तरीही आपल्या प्रथा-परंपरा सुरू राहाव्यात आणि आपल्या पुढील पिढीला त्या कळाव्यात म्हणून आजही आम्ही हे नित्यनेमाने करतो. 

मागच्या वर्षीपासून (3 वर्षाचा झाल्यानंतर) माझा मुलगा घराच्या आजूबाजूला नंदीबैल फिरायला न्यायला लागला आहे. जो त्याच्या आजोबांनी (माझे सासरे) घेऊन दिलेला आहे . त्याची आजी(माझी आई) मस्त सजवून देते. अकखा दिवस लगबग असते आणि मुलाच्या मनात उत्कंठा असते (आमच्याही मनात लहानपणी असायची) की, संध्याकाळचे 4 कधी वाजतील आणि कधी पोळ्यात नेऊन आपला नंदीबैल इतरांसमोर उभा करून कसा सुंदर सजविला आहे? याची पोहोचपावती मिळेल आणि मग घरोघरी जाऊन त्याची पुजा करून आणेल.

येश्मितला सध्या इतकं काही कळत नाही पण तरीही त्याच्यात उत्साह असतो की, नंदीबैल आज वर्षातून एकदा चालवायला मिळणार. आज घरोघरी फिरवून आणला की, मग पुन्हा त्याला व्यवस्थित झाकून सज्ज्यावर ठेवल्या जातो. जेणेकरून पुढीलवर्षी पुन्हा वापरता येईल.

असा हा 'तान्हा पोळा' लहान मुलांनासुद्धा नकळतपणे भूतदया आणि शेतात वर्षभर कष्ट करणार्‍या शेतकर्‍यांविषयी आणि बैलांविषयी कृतज्ञता शिकवून जातो. 

जपा आपले सण, आपली संस्कृती!

धन्यवाद!

पवन✍️


भारत 1989-2014 आणि नंतर - आमुलाग्र बदल!!

रविवार विशेष!! आजचा लेख जरा जास्तच मोठा आहे. पण भारताचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ समजून घ्यायचा असेल, तर आवर्जून वाचाच. भारतात नेहमीच...