Saturday, July 10, 2021

25 डिसेंबर 2015 ची पाक भेट, मोदींच्या अखंड भारताच्या दिशेने पहिले पाऊल होती? बटरफ्लाय इफेक्ट!!

वरचे शीर्षक वाचून मनातल्या मनात तुम्ही मला 'वेडा' ठरवाल हे मला माहिती आहे, परंतु तुम्ही जर खालील घटनाक्रम वाचला तर कदाचित शीर्षक तुम्हाला समर्पक वाटेल आणि बर्‍याच गोष्टींची लिंकसुद्धा जुळेल ज्याला 'बटरफ्लाय इफेक्ट' म्हणतात.

सन 2014 ला मोदी पंतप्रधान झाले आणि त्यांनी अनेक देशांना (पंतप्रधान/राष्ट्रपती) आपल्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले. त्यामध्ये, आपला कट्टर शत्रू मानतो तो देश म्हणजे पाकिस्तानसुद्धा होता. निमंत्रण स्वीकारून पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी या सोहळ्याला हजेरी सुद्धा लावली होती.



असे म्हणतात की, नवाज शरीफ हे नेहमीच भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या बाजूने होते. उदाहरण घ्यायचे झाल्यास 1999 मध्ये पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांची पाकिस्तान भेट. परंतु तिथली आर्मी आणि जनता ही कधीही भारतासोबत चांगले संबंध प्रस्थापित व्हावे या बाजूने नव्हतीच. त्यामुळेच वाजपेयी दौरा झाला आणि पाकिस्तानी आर्मीने कारगिल घडवून आणले. परंतु अटलजी अटल राहिले आणि पाकिस्तानला माघार घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही. ज्यातून पुनर्प्रस्थापित होवू शकणारे संबंध आणखी ताणल्या गेले. कारण तिथल्या आर्मीला  तिथे कधीही लोकशाही नको होती आणि अमेरिकेलासुद्धा बहुमताने आलेल्या लोकशाही सरकारपेक्षा पाक आर्मीची सत्ता पाकिस्तानात असणे सोयिस्कर होते. कारण त्यातून अफगाणिस्तानमध्ये सत्तेत असलेल्या तालिबानवर अंकुश ठेवणे सोपे होते, म्हणून अमेरिका सुद्धा त्यांना मदत करत होते. त्यातच कारगिल प्रकरणाचा दोष हा नवाज यांनी आर्मीला दिला आणि बहुमताने आलेल्या नवाज सरकारचे पतन झाले. त्यानंतर नवाजवर खटले दाखल करण्यात आले त्यांना क्लिंटनने फाशीपासून वाचविले आणि नवाज यांनी परदेशी प्रस्थान केले.



2014 ला मोदींचा राष्ट्रीय पटलावर उदय झाला आणि त्यांनी अखंड भारताच्या दिशेने पाऊल टाकायच्या दिशेने सुरुवात केली असेच मी म्हणेल. कारण, आपल्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण त्यांनी अनेक देशांना तर दिलेच. सोबतच, आवर्जून आपल्या शेजारी देशांना सुद्धा दिले, त्यात पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, भुतान इत्यादी देश होते.


पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी या राष्ट्रांना अधिकृत भेटी सुद्धा देणे सुरू केले. तसेच इतरही अनेक राष्ट्रांना त्यांनी भेटी दिल्याच होत्या. (पाकिस्तानला भेट दिलेली नव्हती) परंतु, नवाज शरीफ यांच्या नातीचा लग्नसोहळा पाकिस्तान मध्ये पार पडत असताना  मोदी काबुलच्या अधिकृत दौर्‍याहून भारतात परत येत असतानाच विमानातून फोन केला गेला "आपकी नाती की शादी मे शरीक होने का सौभाग्य हमको नही देंगे क्या?" आपल्या दौर्‍यात नसतानाही अचानक नवाज शरीफ यांना फोन करून पाकिस्तानमध्ये भेट दिली. त्यानंतर अनेकांना ही शंका यायला लागली की, मोदी अखंड भारताच्या दिशेने वाटचाल करताहेत. कारण, मोदी कितीही सांगत असले की, ही भेट अचानक ठरलेली होती तर मी फक्त एकच गोष्ट सांगतो आणि त्यावरून तुम्ही ठरवा की, त्या गोष्टीत अर्थ आहे किंवा नाही?


मोदींनी ज्यावेळी पाकिस्तानला भेट दिली त्यावेळी नवाज शरीफ यांच्या नातीचे लग्न होते (संभवत: अफगाणिस्तान दौरा जाणीवपूर्वक नातीच्या लग्नावेळी ठरवला गेला असणार) आणि मोदींनी नवाजला भेट म्हणून 'राजस्थानी फेटा' दिला होता. जो त्यांनी रिसेप्शन मध्ये घातला होता. आता हा राजस्थानी फेटा त्यांनी पाकिस्तान मध्ये खरेदी केला असेल? की भारतातून आधीच घेऊन निघाले असतील? जर आधीच घेऊन निघाले असतील तर मग ही भेट पूर्वनियोजित नव्हती?




पाकिस्तानसाठी ही भेट अचानक असेल पण मोदींनी ही भेट पूर्व नियोजन करून घेतलेली होती असेच यातून दिसून येते.

यानंतर पुन्हा पाक आर्मीच्या पोटात गोळा उठला व त्यातून आता इतिहासाची पुंनरावृत्ती होणार होती. जी गोष्ट अटलजींच्या भेटीनंतर झाली होती तीच आता मोदींच्या भेटीनंतर होणार होती. पण यावेळी  अमेरिकेला पाकशी काहीही देणे-घेणे नव्हते. कारण लादेनचा खातमा झालेला होता आणि त्यामुळे त्यांना आता पाकमध्ये आर्मीच्या सत्तेऐवजी स्थिर सरकारची गरज होती, म्हणून अमेरिका पाक आर्मीला पाठबळ न देता लोकशाहीलाच पाठिंबा देणार आणि त्यातून पाक आर्मीला कोणतेही आततायी पाऊल उचलू देणार नाही  ह्याची पूर्ण खात्री मोदींना होती, आणि झालेही तसेच. (अटलजी यांच्या भेटींनंतर कारगिलचे पाऊल)

परंतु, भारताला पाकिस्तान हा अस्थिर हवा होता.

आणि शेवटी पाकिस्तान आर्मी व तेथील जनतेची भारतविरोधी मानसिकता बघता अमेरिकेला हार मानावीच लागली.

भेटीनंतर सातच दिवसात म्हणजेच 2 जानेवारी 2016 ला पठाणकोटमध्ये आतंकवादी हल्ला केला. जाणीवपूर्वक मोदींनी कडी निंदा करण्याव्यतिरिक्त काहीही केलं नाही (पण चेंडू नवाजच्या कोर्टात बेमालूम न बोलता टोलवला)

भारत सरकारने घेतलेल्या बोटचेपी भूमिकेची निंदा होऊ लागली,पण पाकिस्तानमध्ये मसूद अझहर व आर्मीची वाहवाही होऊ लागली,भारत सरकारने मात्र ह्या मागे मसूद असल्याचे ठोस पुरावे नवाज सरकारला दिले. (नवाज हा एकमेव पाक प्रधानमंत्री होता जो भारताशी चांगले संबंध ठेवण्यास इच्छुक होता आणि त्यात सातच दिवसापूर्वी झालेल्या भेटीने भर पडून मोदी-नवाज जवळ आलेले होतेच)

2019 मध्ये मोदींनी मुलाखतीत त्या घटनेचे केलेलं विश्लेषण जरूर ऐका.


नवाजने मसूद वर कारवाई करून नजरबंद केले, यातून पाक आर्मी बिथरली, आर्मीने जनतेला चिथावणी दिली आणि  त्यातून जागोजागी 'नवाज हटाव' च्या मोहिमा निघाल्या आणि नवाजच्या जुन्या केसेस आर्मीने बाहेर काढल्या (त्यातील एक पणामा प्रकरण) आणि नवाजला पायउतार होऊन पुन्हा एकदा परागंदा व्हावे लागले.



आणि कुटनीतीचा पहिला चरण पूर्ण झाला होता. कारण पाकिस्तानातील बहुमताचे सरकार जाऊन  तिथे निवडणुका लागल्या व तेव्हापासून ते आजतागायत पंतप्रधान म्हणून आर्मीच्या हातचे बाहुले बसले होते/आहे, ज्यातून अस्थिरता निर्माण झालेली होती/आहे. बुजगावणे प्रधानमंत्री आणून बसविल्यामुळे सर्व निर्णय आर्मीला घेणे सोपे पडणार होते आणि हेच मोदींनासुद्धा हेच हव होते. मोदींना पाकिस्तान हा पूर्ण लोकशाहीयुक्त नकोय. कारण तसा पाकिस्तान असल्यावर त्याच्यावर आघात करणे सोपे नाही. परंतु, आर्मीच्या हातात सत्ता असताना अस्थिरता जास्त असते आणि आपले काम साधने  सहज शक्य होते.



या अस्थिर सरकारच्या अस्थिर वातावरणात भारतातील  उरीमध्ये हल्ला केला गेला. त्यातून पाकिस्तानला हेच दाखवून द्यायचे होते की, आम्ही भारताच्या विरोधात आहोत. पण ह्यावेळेस त्यांच्या अंदाज चुकला होता आणि तो चुकणारच होता. कारण भारताला अस्थिर पाकिस्तान पाहिजे होता जो पठाणकोटच्या वेळी नव्हता परंतु आता उरीच्या वेळी तो अस्थिर झालेला होता आणि उरी हल्ल्यास प्रत्युत्तर म्हणून 10 दिवसांनी  भारतीय सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केली आणि उरीचा बदला घेतला.

हा नवीन भारत आहे, 'जो घर मे घुसकर बदला लेता है', हे पाकिस्तानला आणि जगाला दाखवून दिले.




अस्थिर झालेल्या पाकिस्तानवर त्याचे कंबरडे मोडण्यासाठी मोदींनी दूसरा घाव घातलाभारतात 8 नोव्हेंबर 20016 ला नोटबंदी केली आणि अगोदरच अस्थिर वातावरणात असलेला पाकिस्तान कमरेतून पूर्णपणे तुटला.  तुम्ही कितीही अमान्य केले तरी सत्य हेच आहे की, पाकिस्तानमध्ये नकली नोटा छापून त्या भारतात आतंकवादी कारवाया करण्यासाठी वापरल्या जातात. पण अचानक नोटबंदी झाल्यामुळे त्यांचे कंबरडे मोडले गेलेच. निदान काही काळासाठी तरी का होईना.


वरील सगळ्या घटना घडत असताना 2019 च्या निवडणुका जवळ येत होत्या आणि भारतातील विरोधकांनी मोदीचा धसका घेतला होता. त्यामुळे मोदी परत येऊ नयेत म्हणून भारतातील विरोधी पक्षांची मदत पाकिस्तानने करावी म्हणून साकडे घातले गेले. (मणिशंकर अय्यरचा विडिओ)

त्या मागणीची पूर्तता करन्यासाठी पाकिस्तानने पीओकेमध्ये पुरेपूर खबरदारी घेऊन 2019 च्या निवडणुकीच्या आधी पुलवामा घडवला गेला, ज्यातून 2019 च्या निवडणुकामध्ये मोदींना टार्गेट करून त्यांना खाली खेचायचे होते. पण यावेळी पाकिस्तानचा अंदाज मागच्यावेळीपेक्षाही जास्त चुकला होता. कारण पुलवामाचा बदला/उत्तर म्हणून मोदींनी भारतीय सैनिकांना थेट पाकिस्तानी भूमीत 80 किलोमीटर आतपर्यन्त घुसून हल्ला चढवायला लावला आणि या बालाकोट एयर स्ट्राईकने देशातील विरोधी पक्ष, डावे पत्रकार व पाकिस्तानचे दात पूर्णपणे घशात घातले गेले


त्यानंतर भारतात उगम होऊन पाकिस्तानमध्ये जाऊन तो प्रदेश सुजलाम करणार्‍या पाच ही नद्यांचे भारताच्या वाट्याचे 20 टक्के पाणी जे आजपर्यंत भारताने कधीच वापरले नव्हते. ते 20 टक्के पाणी वापरण्याच्या दृष्टीने भारतात पावले उचलली गेलीत. (इंडस करारानुसार) ज्यातून पाकिस्तानसाठी अडचणी निर्माण करण्यात आल्या. 2022 च्या अखेरपर्यत त्याचे भीषण परिणाम पाकिस्तानमध्ये जाणवू लागतील, असे दिसून येते.


वरील सगळ्या घटना या 2019 पर्यंत घडून गेलेल्या आहेत आणि आपल्यासमोर आहेत. सगळं त्या 2015 च्या मोदी-नवाज सदिच्छा भेटीमुळे घडलं असं म्हणणं योग्य नाही आणि अयोग्य ही नाही. पण ह्या सगळ्या घटनांमागे 'ती' भेट आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. कारण त्या भेटीनंतर घडलेली प्रत्येक घटना ही एकमेकांवर अवलंबून आहे किंवा त्यावर आलेली प्रतिक्रिया आहे ज्याच्या मुळाशी 'ती' भेट आहे

हा सगळा त्या सदिच्छा भेटीचा 'बटरफ्लाय इफेक्ट' आहे, असेच यातून  दिसून येते. तसेच जोपर्यंत पाकिस्तानचे तुकडे पडत नाहीत तोपर्यंत भाजपा हा पाकिस्तानला राजकीयदृष्टीने स्थिर होऊच देणार नाही, ही दुसरी बाजूसुद्धा आपल्यासमोर येते. यामुळेच मला वाटते की, ती भेट म्हणजे 'मोदींचे अखंड भारताच्या दिशेने पहिले पाऊल असावे'. (यावर मत-मतांतरे असूच शकतात)

'बटरफ्लाय इफेक्ट' म्हणजे नेमके काय?

उदाहरण म्हणून सांगतो, पहिल्या महायुद्धात 'हिटलर' हा एक सामान्य सैनिक होता, जखमी झाल्यावर त्याच्यासमोर मित्रराष्ट्रांचा एक सैनिक बंदूक रोखून उभा होता पण त्याने हिटलरला गोळी घातली नाही. त्या न झाडलेल्या गोळीने 'दुसरे महायुद्ध' घडले. भारत तसेच इतर अनेक देश स्वतंत्र झाले, जगाचा भूगोल बदलला. ह्या सगळ्या घटना त्या न झाडलेल्या गोळीमुळे घडल्या?

होय साहजिकच!!

भलेही भारताला स्वातंत्र्य त्या न झाडलेल्या गोळीने मिळालेले नाही पण त्या न झाडलेल्या गोळीमुळे ज्या-ज्या घटना घडत गेल्या, त्या घडलेल्या क्रियेवर प्रतिक्रिया होत्या व यातून भारत आणि इतर देश स्वतंत्र झाले. हिटलर त्या गोळीने मारल्या गेला असता तर कदाचित दुसरे महायुद्ध कधी झाले असते आणि देश कधी स्वतंत्र झाले असते याची कल्पना न केलेली बरी.


प्रत्येक मोठ्या घटनेच्या मुळाशी गेल्यावर त्या ठिकाणी घडलेली एक क्षुल्लक तत्कालीक घटना असते व त्या घटनेला त्यावेळच्या इतिहासात कोणतेही स्थान नसते यालाच 'बटरफ्लाय इफेक्ट' म्हणतात.

असाच आणखी एक बटरफ्लाय इफेक्ट म्हणजे प्रेमजी ठक्कर यांचा मासे विक्री करण्याचा निर्णय हा भारत-पाकिस्तान निर्मितीस करणीभूत आहे.  तुम्हाला हसायला येईल पण एकदा प्रेमजी ठक्कर यांचे नाव गूगल करा आणि माहिती घ्या, मग तुमच्यासमोर सगळ्या कड्या जोडल्या जातील.

हा विषय आणि मुद्देसूद संकल्पना ही मिलिंददादांची आहे आणि त्यांनीच सगळ्या कड्या जोडलेल्या आहेत. मी फक्त शब्दांकन करून आपल्यासमोर मांडलेले आहे. 3 इडियटच्या डायलोगप्रमाणे, बोल वो रहे है, लेकीन शब्द मेरे है!

त्यांनी विश्वास दाखविला त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार!

धन्यवाद!

पवन✍️



भारत 1989-2014 आणि नंतर - आमुलाग्र बदल!!

रविवार विशेष!! आजचा लेख जरा जास्तच मोठा आहे. पण भारताचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ समजून घ्यायचा असेल, तर आवर्जून वाचाच. भारतात नेहमीच...